Manjiri/Tanishka
This page has the latest and fresh blogs
31/03/2022
©️®️ मंजिरी शास्त्री.
#माझेलेखन __ चैत्रपालवी
#मराठीभाषा
#मराठीसाहित्य
#मराठी
#रखरखत्या उन्हाळ्याचाताप ..
कुणासाठी वरदान तर कुणासाठी शाप ..
मार्च मधे होळी झाली कि हळुहळू थंडी कमी व्हायला लागते आणि उन्हाची तीव्रता वाढायला लागते.झाडांवर दुर्मिळ झालेली फुलं डोकावून फुलत असल्याची जाणीव करून देतात. संध्याकाळी फिरताना मोगर्याचा मंद सुगंध दरवळला कि ऊन्हाळ्याचं आगमन झाले असं समजायला हरकत नसावी.. टेरेस गार्डन मधे लावलेल्या कुंडीमधला वेली मोगरा जेव्हा रात्री बेडरुमपर्यंत पोहोचतो तेव्हा वेगळ्या रुमफ्रेशनरची गरज भासत नाही.. सकाळी सकाळी परडीभर गोळा झालेली फुलं पाहुन नकळत देवाच्या हारासोबत छोटासा गजरा सुद्धा विणला जातो आणि संध्याकाळी"अहो " घरी यायच्या वेळी अलगद केसात माळला जातो ..
दुपारच्या वेळी घाम पुसत आलेल्या पाहुण्यांना कलिंगडाची फोड .. खरबुजाचं शिकरण .. कैरीचे पन्हे दिलं कि त्यांच्या चेहऱ्यावर च्या आनंदावरुन आपणही भरुन पावतो .. स्वयंपाक घरात जुने नवे पद्धतीचे माठ विराजमान होतात .. एके दिवशी अंगणात पाणी टाकताना घरासमोरील पिंपळ व बेलाच्या झाडांची पानं गळुन नुसत्या वाळलेल्या काड्या दिसल्या .. आमच्या अंगणात रोज पंधरा दिवसांपासून वाळलेली पानं झाडायचं काम वाढलं होतं.. मी झाडायला घेतलं तसा आदित्य पानांवर चालून कर् कर् येणार्या आवाजाचा आनंद घेत होता .वाहाणार्या वार्याबरोबर उडणार्या पानांना जमिनीवर पडायच्या आधी पकडु पहात होता .. थोडा वेळ खेळ झाल्यानंतर पाहातो तोपर्यंत माझं झाडुन झालं होतं आणि पुन्हा लगेच वरुन पानं पडायला सुरुवात झाली होती..
"काय गं हे आई?? आत्ताच झाडलसं पुन्हा पानं जमा व्हायला सुरुवात झाली .."असं म्हणत असतानाच त्याचं लक्ष पिंपळाच्या आणि बेलाच्या झाडाकडे गेले .. एकदा अंगणातील बहरलेल्या मोगरा .. जास्वंदी व तगरीच्या फुलझाडांनी लक्ष वेधून घेतले .. आणि त्या दोघांच्या थोडं दुर कैर्यांनी लटकलेला आंबा देखिल दिसला ... भलं मोठं प्रश्नचिन्ह घेऊन तो माझ्यासमोर उभा राहिला .. " आई एकच उन्हाळा पण सगळ्यांसाठी वेगळा .. असं कसं ??"
त्यावर मी उत्तरले ..."ऋतूचक्रातील बदलाप्रमाणे निसर्ग सुद्धा त्याची साथ देतो .. फुलं .. फळं .. धान्य हे प्रत्येक ऋतुतलं वेगळं आणि त्या ऋतुशी संबंधित असं असतं .. जसं या उन्हाळ्याच च बघ .. इतका उकाडा वाढतो कि .. अंगाची लाही लाही होते ..जीव नकोसा होतो .. खायची इच्छा नसते .. असं वाटतं नुसतं पाणी पित राहावं . अंगाच तापमान थंड ठेवण्यासाठी कुलर .. एक.सी .वापरले जातात.खाण्यात पाण्याचा समावेश असलेले पदार्थ वापरले जातात .. जसं काकडी .. कलिंगड . .खरबुज ..करवंद ... ऊस .ज्या फळाला पिकायला जास्त उष्णतेची गरज असते असा फळांचा राजा आंबा हा उन्हाळ्यात येतो ..काहि झाडांची पानगळती होते ..आणि नविन पालवी फुटते.. मनाला धुंद करणारा मोगरा याच दरम्यान फुलतो .. पण हे सगळ्यांसाठी नाही लागु होत.झेंडु .. तुळस .. शेवंती .. अशी नाजुक फुलं या उन्हाळ्यात मरुन जातात कारण त्यांना हा उन्हाचा ताप सहन होत नाही .. पण शेतात चणा .. सोयाबीन आणि गहु याच दरम्यान पिकतो .. म् णजेच निसर्ग ऋतुनुसार बदलतो आणि समतोल सांभाळतो .. काहि गोष्टींसाठी हा सृजनाचा काळ असतो तर काहिंसाठी लूप्त होण्याचा .. म्हणुनच "जरी रखरखत्या उन्हाळ्याचा ताप ... कुणासाठी वरदान तर कुणासाठी शाप ..."
धन्यवाद.लेख आवडल्यास नक्की लाईक व कमेंट करा.तुमच्या कमेंट्स नी लिखाणाचा उत्साह द्विगुणित होतो.
31/03/2022
#मराठी
# मराठी साहित्य
#मराठीभाषा
हाक दे तु मला ...
सोसायटिच्या मिटिंगसाठी सगळे सभागृहात जमले होते.नविन वर्ष कसं साजरं करायचं??काय कार्यक्रम मुलांसाठी .. बायकांसाठी काय हे ठरवण्यासाठी हि मिटिंग ठेवली होती.. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे सगळीकडे सामसूम होती.. जो तो आपापल्या बाल्कनीत.. खिडकित उभे राहुन दुरून एकमेकांना शुभेच्छा देत कोरोनापासुन सुरक्षित राहाण्याचे सल्ले देत होता.ज्याला जी नविन माहिती मिळायची तो सगळ्यांसोबत शेअर करायचा.. दुरुनच एकमेकांचे हालचाल विचारणे आणि मदत करणे यातच दोन वर्ष गेली..दोन वर्षांपूर्वी हेच दिवस होते जेव्हा पासुन हे दुष्ट कालचक्र सुरू झालं होतं ..
पण दोन वर्षांनंतर आता कुठे स्थिती निवळताना दिसते आहे .. म्हणून सगळे सभासद या कार्यक्रमासाठी उत्साहित होते.एकेक करुन सगळे जमायला लागले.. नीता आधीच पोहोचली होती.. थोड्या वेळाने भारती सुद्धा पोहोचली .. पण दोघींनीही एकमेकांकडे पाहुन न पाहिल्या सारखं केलं.. दुर दुर बसल्या दोघी .. आणि मिटिंग संपवून सगळे घरी गेले. एकाच बिल्डिंग च्या दोन वेगवेगळ्या विंग मधे राहाणार्या या दोघी बालमैत्रिणी .. दोघींचेही सासर गावात .. पण एक या टोकाला तर दुसरी त्या टोकाला..
म्हणून दोघींच्या नवरोबांनी सोयिस्कर बघुन एकाच वेळी हे फ्लॅट बुक केले होते आणि दोघींना सरप्राइज दिले होते.चार वर्ष पुर्ण झाली त्यांना इथे राहायला येवुन .. दोघींना आभाळ ठेंगणे झाले होते.. पण म्हणतात ना कि गैरसमजाचं बिज मोठ्यातल्या मोठ्या झाडाला पोखरून टाकतं .. तसचं काहिसं या दोघींबाबत झालं. त्याचं काय झालं??नीता आणि भारती दिवसभराची कामं संपली कि या तर नीताच्या घरी अड्डा मारायच्या या तर भारतीच्या घरी .. जेव्हा कोरोना ने हातपाय पसरायला सुरुवात केली तेव्हा सोसायटी सिल केल्या गेल्या.जे काही हवं असेल त्याची लिस्ट दरवाज्याबाहेर पैश्यांसोबत ठेवायची .. बाहेर अजिबात पडायचं नाही असे कडक नियम होते .. तेव्हा नीताच्या नवर्याला कोरोना झाला.
भारती ला घरी राहावेना .. पण तिच्या नवर्या ने नीता ला भेटायला स्पष्ट नकार दिला."जी मदत करायची ती दरवाज्या बाहेरून मी करुन येईन ...तु कुठेही जायचं नाही.. "अशी अट घातली .. दोघींच्या विंग वेगवेगळ्या असल्याने भेटणं अजिबात शक्य नव्हते.. पण नीताच्या खिडकीतून भारतीच्या विंग मधे काय सुरू आहे ते दिसायचं .. भारती नीता ला भेटायला नाही जाऊ शकली पण तिच्या हि नवर्या ची सलग ड्युटि असल्याने दुध .. भाजी .. ब्रेड ... किराणा सामान आणण्यासाठी खाली असलेल्या दुकानात जावे लागते..
जेव्हा नीताच्या घरी सगळ्यांची तब्येत खराब होती तेव्हा भारती तिला भेटायला गेली नाही पण खाली दुकानात तिच्या शेजारणी सोबत जाताना दिसली .. नीता ला तेव्हा भारतीचा खुप राग आला.. कि मला भेटायला आली नाही .. नुसती फोनवरून चौकशी केली आणि शेजारणी सोबत मात्र हसुन हसुन बोलते आहे.. नीता ला भारतीच्या नवर्याच्या ड्युटिबद्दल अंदाज नव्हता..तो फ्रंट वाॅरीयर म्हणून काम करत असल्याने घरची सगळी जबाबदारी एकट्या भारतीलाच उचलावी लागत होती .
सगळं निवळल्यावर भारती नीता ला भेटायला सुद्धा गेली .. .पण नीता ने अर्धवट दरवाजा उघडला.. तिथुनच तुटकपणे भारतीशी बोलली .. "आत ये "वगैरे काही नाही..भारतीला खुप वाईट वाटले .. नीताच्या वागण्याचा रागही आला आणि संतापात ती घरी आली आणि अश्या प्रकारे दोघींचं बोलणं बंद झाले.. त्यांच्या नवर्यांना या सगळ्यांची कुणकुण लागली होती.. दोघांनीही बाहेर भेटुन एकमेकांशी बोलुन गैरसमज सोडवला .. पण आता कठिण होतं ते या दोघींचा अबोला तोंडणं .. भारती आणि नीताच्या नवर्या ने दोघींशी बोलण्याचा प्रयत्न केला पण दोघी ढिम्म हलायला तयार नव्हत्या ..
अश्यात ह्या कार्यक्रमाची बातमी कळाली .. आणि दोन्ही मैत्रिणींच्या नवर्यांनी झकास प्लान बनवला .. नविन वर्षाच्या कार्यक्रमासाठी सगळे छान तयार होऊन जमले होते .. सोसायटिच्या आवारात जेष्ठ मंडळींकडून गुढी उभारली गेली आणि मग सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.. सगळे नाश्ता करत असताना भारती सोबत उभ्या असलेल्या तिच्या नवर्याने नीताच्या नवर्याला हाक मारली .. दोनदा हाक मारूनही आवाज त्यांच्यापर्यंत काही पोहोचला नाही कारण खुप गजबजाट सुरू होता .. अनवधानाने नवर्याचा हाक मारायचा प्रयत्न पडलेला पाहून भारती ने जरा जोरात "नीता"अशी हाक मारली ..
तिची हाक ऐकून क्षणात नीता वळली ..आपण नीताशी बोलत नव्हतो हे साफ विसरलेल्या भारतीच्या लक्षात जेव्हा ही गोष्ट येते कि आपण "नीता "ला हाक मारली आहे .. ती कावरीबावरी होते . एव्हाना तिची हाक ऐकून नीता जवळपास धावत तिच्या जवळ पोहोचते .. आणि जणु काही झालंच नाही अश्या आविर्भावात बोलायला लागते .. भारतीसुद्धा सुरवातीला थोडी बावचळते पण नीताचे बोलणे ऐकून ती सुद्धा फ्री होत गप्पा मारायला लागते. .जरा वेळ गेल्यावर भारतीचा नवरा नीता ला म्हणतो .. "नीता मला माफ कर .. भारती माझ्या सांगण्यावरून तुझ्या कडे आली नव्हती .. आणि मी सुद्धा सतत ड्युटी असल्याने बाहेर बाहेरच होतो .. त्यामुळे कदाचित तुमच्या दोघींमध्ये गैरसमज झाला आहे .. तो संपवुन पुन्हा तुमची मैत्री व्हावी .."
हे बोलणं ऐकून नीता म्हणाली .. "खरचं जीजू .. मी जरा जास्तच रागावले होते .. त्यामुळे माझी मैत्रीण हरवली होती.. पण आज तिनी हाक देवुन मला परत बोलावले आहे .. त्यामुळे तुमची माफी नको मला .. माझी मैत्रीण मिळाली तेवढ्यानेच पोट भरलं माझं .."असं म्हणत दोघी एकमेकांना चिकटतात आणि दोघींचे नवरे प्लॅन सफल झाल्याबद्दल एकमेकांना डोळा मारतात ...
धन्यवाद . लेख आवडल्यास नक्की लाईक व कमेंट करा.तुमच्या कमेंट्स नी लिखाणाचा उत्साह द्विगुणित होतो.
04/03/2022
©️®️ मंजिरी शास्त्री.
#मराठी
#मराठीभाषा
#मराठी साहित्य
#मिटवा हे भेद सारे
#नाॅमिनीला मुलगी का नाही चालत??
शांभवी आणि नरेश सुखी जोडपं होतं.दोघंही नोकरी करणारे त्यामुळे घरी मुलांना सांभाळायला दोघांच्याही सासुबाई अधुन मधुन असायच्या.शांभवी ची मोठी मुलगी सई ही सहा वर्षांची होती तर लहाना ओम दहा महीन्यांचा होता.हसतं खेळतं हे कुटुंब संपूर्ण समाधानी होतं.तसं शांभवी ला सगळ्यांनी पहीली मुलगी झाली तेव्हा खुपच बोल लावले.पण ती मात्र अजिबात न खचता सगळ्यांना बरोबर उत्तरं देई....तसं पाहिलं तर सई ही सगळ्यात मोठं अपत्यं होतं घरातलं...पण मुलगी म्हणून तिला कोणी जवळ घेईना....जाऊबाईंना दोन वर्षांनी मुलगा झाला त्याचं मात्र खुप कौतुक केलं गेलं आणि शांभवी ला मात्र मुलगी झालेली असल्याने कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होवू दिलं नाही..."तुझी सावली नको पडायला कोणावर...तुला फक्त मुलगीच आहे...मुलगा होणारच नाही तुला...मिरव पोरींना घेऊन..."
"माझ्या बाळामुळे मी आई झाले... त्यामुळे माझं बाळ जरी ते मुलगी असलं तरी मला तितकंच प्रिय आहे..मुलाची आई व मुलीची आई यात काय फरक आहे सांगाल का मला???मुलगा असला तर कमी त्रास आणि मुलगी असेल तर जास्त त्रास असं काही असतं का?? नाही ना...मग कशाला बोल लावता मला...?"शांभवी तिच्या परीने समजावण्याचा प्रयत्न करत असे ...पण समाजाची मानसिकता कशी बदलणार ती एकटी??पण एक चांगलं झालं कि तिच्या ह्या पवित्र्यामुळे नातेवाईक तिला समजु लागले..
एकदा नरेश बॅंकेत गेला असताना त्याला तिथे पैसे गुंतवणुकिची एक योजना दिसली.त्या संदर्भातली सगळी माहिती घेऊन तो घरी आला आणि त्याने शांभवीला त्या योजनेबद्दल सांगितले.शांभवी ला सुद्धा ही योजना खुप आवडली.तिने लगेच होकार कळवल्यामुळे आवश्यक ती कागदपत्रे घेऊन दोघं जणं बॅंकेत पोहोचले.संबंधित अधिकार्यांची भेट घेतली .त्यांनी सुद्धा काही वेळात कागदपत्रे तयार केली आणि शांभवी व नरेश या दोघांनाही एक प्रश्न विचारला..."नाॅमिनी मधे कुणाचं नाव टाकायचं???"त्यावर वेळ न दवडता दोघंही पटकन म्हणाले..."सई चं ..."या उत्तराने ते अधिकारी जरा सपापले...
"अहो मुलीचं नाव नाॅमिनी ला नाही चालत... तुम्ही असं करता का??तुमचा मुलगा दहा महीन्यांचा आहे त्याचं नाव लावा नाॅमिनीला..."
शांभवी ..."पण मुलींचं नाव नाॅमिनीला लावायचं नाही असा नियम आहे का??"
अधिकारी ...."नाही.असा कोणताही नियम नाही...पण आजपर्यंत कुणालाही मुलीला नाॅमिनी ठेवताना मी पाहीले नाही म्हणून विचारले तुम्हाला..."
शांभवी ... "मुलीला नाॅमिनी ठेवायचं नाही असा नियम नाही पण कोणी अजुन पर्यंत ठेवलं नाही म्हणून मी ठेवायचं नाही...मुलगा अजुन वर्षभराचा पण नाही तरीही तो नाॅमिनी म्हणून चालतो पण मोठी मुलगी सहा वर्षांची आहे ती नाही चालत ...हा किती मुर्खपणा आहे???ते काही नाही..मला या गुंतवणूक योजनेच्या नाॅमिनी मधे सई चं नाव हवं आहे.. तुमच्या कडून होणार असेल तर ठिक नाहीतर आम्ही दुसरीकडे जातो...."असं कडक शब्दांत म्हणत शांभवी खुर्चीवरून उठते तसं ते अधिकारी थोडे गांगरतात...
आणि शांभवी व नरेश च्या त्या गुंतवणूक योजनेच्या नाॅमिनी मधे सई चं नाव टाकतात.शांभवी आणि नरेश नी खुप विचारपूर्वक सगळ्या गुंतवणूक केल्या ...आजही करत आहेत.हि जवळपास तिस वर्षांपुर्वी ची घटना आहे.पण समाज आणि त्याची मानसिकता आजही बदलायला तयार नाही....पण हे ही तितकेच खरे कि असे हे छोटे छोटे भेदभाव मिटवण्याची सुरुवात आपणच करायला हवी...कोणाची वाट न पाहता...
धन्यवाद.लेख आवडल्यास नक्की लाईक व कमेंट करा.तुमच्या कमेंट्स नी लिखाणाचा उत्साह द्विगुणित होतो.
15/02/2022
#मराठी
#मराठीभाषा
#मराठीसाहित्य
में घर केला रहुंगा क्या???
आजचा विषय.... # आई तु जाऊ नकोस ना...
लग्न झालं तेव्हा सहमताने मी घरी राहायचा निर्णय घेतला होता.कारण माझ्या आईचा मला कमी मिळालेला सहवास मनात घर करून बसला होता.त्यामुळे घरातल्या घरात काही काम करू शकेन असं म्हणत पार्लर हा व्यवसाय निवडला.घरातल्याच एका खोलीत नीट व्यवस्था करुन काम सुरू केले.जेणेकरुन मुलं समोर राहातील...काम पण होईल आणि कमाई सुद्धा...मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मोठी पाच वर्षांची होती पण लहान लेकरु दोन वर्षांचं... जेमतेम बोलायला शिकलेलं...मी काम करताना मांजरीच्या पिल्लासारखं आजुबाजूला घुटमळायचं..
बरं तसं म्हटलं तर त्याचे आजी आजोबा असायचे आणि कधी कधी बाबा सुद्धा ..पण तरी मी हवी असायचीच...मला वाटायचं सगळे सोबत हवे म्हणून किंवा मी छान खाऊ करुन देते म्हणून ...पण एका घटनेने माझं हे मत पुर्ण पणे बदललं... आदित्य चे बाबा ऑफिसच्या कामासाठी पंधरा दिवस बाहेर गेले होते.आणि नेमकं त्या दरम्यान माझं एक दिवसाचं सेमिनार आलं.
नाही करु असा विचार केला एकदा पण अशी संधी पुन्हा मिळत नाही म्हणून आई बाबांना विचारले..."सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे सेमिनार...मी गेले तर चालेल का??"क्षणाचाही विलंब न लावता दोघेही हो म्हणाले..मनावरचं थोडसं ओझं कमी झालं.सासुबाई माझ्या पाठी येत म्हणाल्या ..."तु तुझं आवर आणि नीघ.आज स्वयंपाकघराचा ताबा मी घेते..."व्वा ...अंधा मांगे एक और भगवान दिए दो... अशी गती झालेली माझी.
मस्त गोल गिरकी घेतली आणि सेमिनारमध्ये जायच्या तयारीला लागले.आदित्य शाळेत जात नव्हता तेव्हा..पण अदिती जायची त्या मुळे तिला रात्री सांगितलेलं.. अन् तयारी झाल्यावर निघताना आदित्य ला सांगितले...त्यावर रडवेला चेहरा आणि आवाज करत म्हणाला ..."आप दिनभर नहीं आओगे??तो क्या में दिनभर केला रहुंगा क्या घरमें??"(अकेला शब्द तेव्हा त्याला म्हणता यायचा नाही... म्हणून तो केला असं म्हणायचा..) त्याचा एकंदरीत अवतार पाहून मी येणारं हसु कसंबसं आवरलं आणि त्याला आश्वासन दिले कि "पाच वाजेपर्यंत येते आहे कि परत.."
असं म्हणत मी लगेच सेमिनार साठी बाहेर पडले.वेगवेगळ्या ब्युटिशियन आणि खुप सारी माहिती मिळत होती..वेळ कसा निघत होता कळतच नव्हते.सेमिनारच्या शेवटी सर्टिफिकेट वाटप आणि सोबत फोटोसेशन सुरू होतं त्यात अर्धा पाऊण तास उशिर झाला.सेमिनार संपवुन बाहेर पडेपर्यंत पावणेसहा होत आले होते आणि घरी पोहोचेपर्यंत सव्वा सहा..
घरी पोहोचले अन पाहाते काय??अंगणात गेटासमोर खुर्ची टाकून आदित्य आणि त्याची आजी बसलेले..पटकन घटृ मिठी मारत म्हणतो कसा??"अब नहीं जाओगे ना??"मी सहजच बोलले ..."का रे ??"त्यावर काही बोलला नाही पण अजुन जास्त चिकटला....सोडायलाच तयार नाही..कपडे बदलायला म्हणून आत गेले तर पठ्ठ्या दरवाजा लावू देई ना...हा असा का वागतो ते मला समजेना..सारखा ड्रेस पकडुन मागे मागे करत होता...आज त्याला जेवण पण माझ्याच हातून खायचं होतं...एरवी आजी चालायची,.पण आज काहितरी बिघडलं होतं हे नक्की.
दुसऱ्या दिवशी सकाळी आई येऊन मला म्हणाल्या ..."अगं दिवसभर तिथेच बसून होता.मोठ्या मुश्किलीने एकदाच जेवला बघ..दोन वेळा खाणं आणि दूध काही नाही घेतलं बघ.. अदिती होती म्हणून चार घास जेवला.अन सारखं बोलत होता ..."मम्मा मुझे केला क्यों छोड कें गई??डॅडु भी नहीं है....में कैसे रहुंगा केला???"तु करतेस ते पदार्थ खायला दिले...बाहेरून कुरकुरे ..चिप्स आणले ...कशाला हात लावायला तयार नाही बघ...तु आलीस त्यानंतर जेवला ..."पार सटपटले मी हे ऐकून...
तो झोपलेल्या खोलीत धावत जाऊन पोहोचले...अजुन उठला नव्हता तो... डोक्यावरून हात फिरवला तर ताप भरला होता त्याला...बापरे...लेकराने खरचं धसका घेतला होता...पटकन त्याला उठवलं...तोंड धुतलं दुध बिस्कीट दिलं आणि औषध पाजलं...पण मनात मात्र अपराधबोध जाणवत होता... तापामुळे तो सारखा झोपत होता... तेव्हा क्षणभरासाठी मन बधीर झालं."मम्मा में केला नहीं रहना चाहता...."मनात घर करून गेलं...लेकरू खूप काही बोलू शकलं नाही पण कृतीतून सगळं समजलं होतं...त्याला खरचं मी हवी होते...मी बनवलेलं खाणं किंवा सेवा नाही तर मी माझा सहवास हवा होता... किती सुखद अनुभव होता तो...
धन्यवाद.लेख आवडल्यास नक्की लाईक व कमेंट करा.तुमच्या कमेंट्स नी लिखाणाचा उत्साह द्विगुणित होतो.
11/02/2022
#मराठी
#मराठीभाषा
#मराठीसाहित्य
केस नंबर १
आजचा विषय --- आणि ते श्वास मला मानेवर जाणवत होते..
दिनांक -- ११ फेब्रुवारी
आज सकाळपासून वनिता खुप खुश होती .गाणं गुणगुणत सगळी कामं भराभर उरकवत होती."वनिता ... अगं आज जाई ला तिचे आई बाबा आश्रमात घेऊन येणार आहेत .आज वाढदिवस ना तिचा ...आजचा दिवस इथे साजरा करायचा असतो तिला सगळ्यांसोबत.. खासकरून तुझ्यासोबत.. माहीत आहे ना..."आधारआश्रमाच्या संचालिका मधुताई तिथे समाजसेविका या पदावर काम करणाऱ्या वनिताशी बोलत होत्या.त्यांचं बोलणं ऐकून वनिता काही काळासाठी भुतकाळात पोहोचली होती....
मानसशास्त्रात एम.ए.आणि एम.एस.डब्लु केल्यानंतर वनिता आधारआश्रमात समाजसेविका या पदावर रुजू झाली होती.ति रुजू झाली तेव्हा तिचा दुसरा मुलगा सहा महीन्यांचा होता. दुपारी घरी एकदा चक्कर मारायची .. आणि त्याला सांभाळायला घरी त्याची आजी होती त्यामुळे वनिता ला चिंता नसायची..
वनिता कडे नवजात बालकांचा विभाग होता.ज्यामधे बाळं दत्तक दिली जायची.त्याप्रक्रियेत कागदपत्रांची काही अडचण येऊ न देणे...त्यांची नीट काळजी घेतली जाते आहे का नाही ते पाहाणे ..आजारी मुलांना डाॅक्टरांकडे नेणे तसचं त्यांची सगळी माहिती नीट लिहून फाईल व्यवस्थित ठेवणे ही सगळी जबाबदारी वनिता ची होती....
वनिता नोकरीला लागल्यापासून साधारण महीन्यानंतर एक बाई तिच्या १६ वर्षांच्या गरोदर मुलीला घेऊन आश्रमात आली.मधु ताईंनी तिची केस वनिता कडे सोपवली.त्या मुलीला तो गर्भ कसा राहिला??असं विचारलं तर "माहीत नाही."एवढंच म्हणाली ..".कोणी मुलगा तुझ्यासोबत काही करायचा का??"असं विचारल्यावर लाजत म्हणाली.."व्हय..तो नंदु हाय नव्हं तो कायतरी करायचा ना तवा लय छान वाटायचं..."
तिच्या आईच्या एकंदरीत सांगण्यावरून त्या मुलीला सहावा महीना लागला ..तिची तब्येत बिघडली..डाॅक्टरांकडे नेलं तेव्हा तिच्या गरोदर असल्याची माहिती मिळाली.आता तीचे नऊ महीने पुर्ण होत आले होते आणि त्यांना ते बाळ नको हवं होतं.त्यामुळे बाळाला जन्म देऊन ति आश्रमात सोडुन जाणार होती.
वनिता ने तिची सगळी माहिती नीट फाईलमधे लिहीली."केस नंबर १"...डाॅक्टरांकडे जाऊन तपासणी झाली आणि त्या मुलीची राहाण्याची सोय करण्यात आली.तिसर्या दिवशी सकाळी सकाळी त्या मुलीची प्रसुती अगदी व्यवस्थित पार पडली.आणि एका गोंडस परीला तिने जन्म दिला.सावळं रूप होतं तरी नाजुक ओठ ..जिवणी पाहुन नकळत वनिताच्या तोंडुन "जाई "हे नाव बाहेर पडलं..
संध्याकाळ पर्यंत त्या मुलीची आई तिला येऊन घेऊन गेली.जाताना जाईच्या सोडपत्रावर त्या मुलीने अगदी सुटका झाल्याच्या आनंदात अंगठा टेकवला होता."ब्याद टळली एकदाची ..."असं म्हणत त्या दोघी माय लेकी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तिथुन बाहेर पडल्या.जाताना त्या इवल्याशा जिवाची कुणालाच फिकीर पडली नव्हती.वनिता मात्र त्या बाळाशी जोडली गेली होती.
तिचं स्वतः चं बाळ ती घरी ठेवून यायची.आणि ती स्वतः सुद्धा आई होती त्यामुळे जाई बद्दल तिला विशेष आपुलकी वाटायची.तिच्या आयुष्यातील हा पहीलाच प्रसंग होता.जाई ला सिरींज ने दूध पाजलं जायचं पण तिला ते पिता यायचं नाही..दोन वेळा पाहील्यानंतर वनिताला राहावलं नाही आणि तिने चटकन जाई ला प्यायला घेतलं.तिच्यातली आई तिला उमजु देत नव्हती.
जाईला वनिता स्वतः सांभाळायची.तिला झोपवताना वनिता चे बोट जाईच्या बोटात असायचे.जाईच्या इवल्याशा हृदयाची धडधड ...तिचे मानेवर जाणवणारे श्वास ..हसरे डोळे आणि दूध पिताना होणारी ओठांची नाजुक हालचाल ... वनिता ला हुंदका आवरायचा नाही.इतक्या गोंडस बाळाच्या नशिबात आईचं प्रेम नसावं ??हा विचार वनिता ला अस्वस्थ करायचा.वनिता कामं ऊरकवुन शक्य असेल तितका वेळ जाई ला द्यायची.
सहा महीन्यांनी जाईची पुर्ण तपासणी करण्यात आली.पुर्णपणे सुदृढ असणारी जाई एका दांपत्याला पसंत पडली होती.आणि काही दिवसांतच जाई त्या कुटुंबाचा भाग झाली होती.मधु ताई वनितावर खुप खुश होत्या कारण तिच्या कडे सोपवलेली पहीली केस लगेच दत्तक विधी होवुन पुर्ण झाली होती."तुझे हात खुप भाग्यवान आहेत वनिता...अनाथ बाळाला लगेच घर मिळाले बघ...तु लिहिलेल्या केस नंबर १ लवकर पुर्ण झाली... नाही तर आपल्याकडे अशीच बरीच बाळं आहेत कि त्यांना सगळं व्यवस्थित असुनही दत्तक जाता येत नाही..."
बागेतल्या फुलांकडे एकटक बघत बसलेल्या वनिताचे डोळे इवल्याशा हातांनी झाकले गेले आणि गरम श्वास तिच्या मानेवर तिला जाणवले ...ते इवलेसे हात हातात घेऊन जरा लाडात येऊन वनिता म्हणाली .."कोण आहे बरंं...?"तसं हात झटकत गाल फुगवून थोडं रागात जाई उभी राहिली..."आमी नाही जा..."तिच्या याच नखर्यांची अदा भावली होती वनिता ला...अशी तिची केस नंबर १ तिच्या कायमस्वरूपी लक्षात राहीली होती...
धन्यवाद.लेख आवडल्यास नक्की लाईक व कमेंट करा.तुमच्या कमेंट्स नी लिखाणाचा उत्साह द्विगुणित होतो.
04/02/2022
# मराठी
#मराठीभाषा
#मराठीसाहित्य
बाप्पा मोरया रे...
आजचा विषय.... आणि बाप्पाने आम्हाला तारलं..
शाळेत जायला लागले तेव्हा शाळेत बाईंनी श्लोक शिकवला होता. ..."मोरया मोरया मी बाळ तान्हे..
तुझीच सेवा करु काय जाणे..
अज्ञान माझे कोट्यानकोटी
मोरेश्वरा बा तु घाल पोटी
तु सागर करुणेचा
देवा तुजला ची दु:ख सांगावे
तुज वाचून इतरांते
विन्मुख पसरोंनी काय मागावे??
ऐसा सर्वांग सुंदरु
सकलविद्येचा आगरू
तया माझा नमस्कारू
साष्टांग भावे ."
आणि सकल विद्यांचे सकल शास्त्रांचे आणि प्रथम पुज्य असलेल्या श्री गणेशाचे महात्म्य सांगितले.श्री मोरयाच्या चरणी अशी प्रार्थना करायची कि तु आमच्या चुका पोटात घाल आणि मला सद्बुद्धी दे ... तुझ्याशिवाय मी माझे दुःख अजुन कुणाला सांगणार नाही कारण तुच माझ्या आयुष्याचा तारणहार आहेस..हा अर्थ समजला.अर्थात तेव्हा बालबुद्धीला गणपती बाप्पा हा आपला सगळ्यात जवळचा आहे हे एवढंच समजलं होतं.मी केलेल्या चुका बाप्पाच्या पोटात घ्यायला सांगायचे म्हणजे मी सारख्या चुका करायच्या आणि बाप्पाने माफ करायचं ... किती वाईट वाटले..बिचार्या बाप्पाचं पोट दुखणार नाही का अश्याने??
म्हणून बाप्पाच्या काळजीने चुका टाळायचा प्रयत्न करायला लागले.कारण मला माझा मित्र माझा बाप्पा माझ्यापासून दुर जायला नको हवा होता.एका वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी झालेला प्रसंग कायमचा मनात कोरला गेला आहे...तो प्रसंग आजही आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो.का कुणास ठाऊक त्या दिवशी खुप पाऊस पडत होता.पाच दिवस झाले तसं विसर्जन करायचं ठरलं .पण पाऊस काही थांबेना.बाबा म्हणाले .."मुर्ती हलवुन ठेवा.ऊद्या पाऊस कमी झाला कि करु विसर्जन.."
पण मन काही मानायला तयार होईना.साधारण चार वाजेच्या दरम्यान सकाळपासून सुरू असलेला पाऊस जरा थांबला.मी आईला म्हणाले .."चल ना पटकन गाडी काढ.पाऊस थांबला आहे तोपर्यंत विसर्जन करुन येऊ."हो नाही करत तिने गाडी काढली.रस्त्यात एक मोठा ओढा होता.तो पाण्याने बराच भरला होता.पाणी खूप वेगाने वाहात होतं.आई म्हणाली .."करुया का इथेच विसर्जन??"पण मी हट्टाने "नाही"म्हणाले."चल कि नदीवर... अर्धा रस्ता तर आलोच आहे की..."
तिने गाडी नदीवर नेली.बाप्पाला मनाजोगता निरोप देईपर्यंत पुन्हा पाऊस जोरात सुरू झाला.पटकन विसर्जन आटोपलं आणि आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो.पाहतो तर तिथे रस्ता जाम झाला होता.गाड्या दोन्ही बाजूंनी अडकल्या होत्या.त्यात पाऊसाने जोर धरला होता त्यामुळे खुप अंधार झाला होता.बराच वेळ झाला तरी गाड्या पुढं सरकायचं नाव घेईनात.नदीपासुन आम्ही फार दुर नव्हतो.
पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे नदीच्या पात्रात पाणी वाढायला लागलं.आणि गावात घुसायला लागलं.कोणीतरी मागून ओरडलं ..."पळा पळा पाणी वर चढतयं..."चारचाकी वाले गाड्या सोडुन पळायला लागले.काय करावं??भिती ने हातपाय गार पडायला लागले.तेवढ्यात आई अचानक इकडे तिकडे पहायला लागली... आणि एका ठिकाणी नजर रोखुन तिने गाडी त्या दिशेने वळवली..समोर जाऊन थोडसं डाव्या बाजूला तिरकं वळली तर समोर एक छोटीशी दोन चाकी जाऊ शकेल इतकीच गल्ली होती..."अगं कुठे जाते आहेस??"गाळण उडालेली मी पार घाबरले होते... आईला विचारलं..पण ति फक्त त्या अरुंदश्या गल्लीतुन बाहेर पडायसाठी जिवाचा आटापिटा करत होती.जमेल तसं धडपडत आम्ही ती गल्ली पार केली आणि बाहेर पडलो तर आम्ही मुख्य रस्त्यावर लागलो होतो."अगं अचानक मला असं आठवलं कि इथुन बाहेर जायला अजुन एक रस्ता आहे.मी कधी गेले नव्हते पण कुणाकडुन तरी ऐकलं होतं .ते आठवलं अचानक.म्हणुन आसपास गल्ली दिसते का ते पाहात होते.आणि काय आश्चर्य सापडली ती गल्ली ...देव पावला गं बाई .."
ज्या रस्त्यावर जाम लागला होता त्याच्या शेजारीच ही छोटीशी अरूंदशी गल्ली होती.आईला अचानक त्या गल्लिची आठवण झाली आणि आम्ही सुखरुप त्या रस्त्यातुन बाहेर पडलो.अक्षरश:वेड लागल्यासारखं जीव मुठीत धरून घरी आलो.थोडक्यात बचावलो हे लक्षात आलं होतं.कारण दुसर्या दिवशी पेपर मधे बातमी आली होती कि ..."नदीजवळचा बराच भाग पाण्याखाली गेला होता.आठ तासानंतर ही पाणी ओसरलं नव्हतं.अचानक आलेल्या पुराने तिथे अडकलेली सगळी वाहनं माणसांसकट वाहुन गेले होते.आईला तिथं असताना अचानक आठवलेली ति गल्ली म्हणजे बाप्पाने सुखरूप घरी परतायला करुन दिलेली वाट होती जणु.
दुसर्या दिवशी आधीच्या संध्याकाळची चर्चा सगळे करत होते.त्यावरुन हेच लक्षात आलं कि आम्ही त्या पुराच्या पाण्यात अडकल्या पासुन वाचलो ..त्यातुन सुखरूप बाहेर पडलो ही बाप्पाची कृपा म्हणायची.कारण आमच्या मागे अजुन एक जण येत होते जे आमच्या शेजारी राहायचे..आम्हाला नदीवर भेटलेले..त्यांनी असं सांगितलं कि ..."आपण बाहेर पडलो आणि मागुन येणाऱ्या दोन गाड्या पुराच्या पाण्यात जाताना पाहील्या मी..."
क्षणभर मी स्वतः ला तिथे असण्याची कल्पना केली.आणि भितीने थरथरायला लागले.नकळत अपराधबोध झाला अन् बाप्पा सोबत असल्याची जाणीव झाली.त्यावेळी आईला बाहेर पडायचा मार्ग सुचवुन आम्हाला तारलं होतं.आणि डोळ्यातुन वाहणारे अश्रू बाप्पाचे आभार मानत होते."मोरया रे बाप्पा मोरया रे .."हे भजन मनात अविरत सुरू होतं..
धन्यवाद.लेख आवडल्यास नक्की लाईक व कमेंट करा.तुमच्यि कमेंट्स नी लिखाणाचा उत्साह द्विगुणित होतो.
01/02/2022
#मराठी
#मराठीभाषा
#मराठीसाहित्य
बालपणीचा काळ सुखाचा...
आजचा विषय ... लहानपणीच्या गोष्टी
दिनांक ... १ फेब्रुवारी
"लहानपण देगा देवा ... मुंगी साखरेचा रवा ।
ऐरावत रत्न थोर .... त्यासी अंकुशाचा मार ..।।
लहानपण म्हणजे निरागसतेचा झरा..लहानपण म्हणजे अवखळ आनंदाचा फव्वारा आणि लहानपण म्हणजे ओल्या मातीचा गोळा.कारण लहान मुलांच्या मनात तुम्ही जे भरवाल..जसं त्यांना सांगाल तसचं ते मनात घेऊन मोठे होतात.. त्यामुळे पालकांना लहान मुलं सांभाळणं आणि त्यांच्या निरनिराळ्या प्रश्नांची समर्पक उत्तर देणं हे एक मोठे आव्हान असतं .
जसं मला आठवतं की माझा भाऊ माझ्या पेक्षा लहान होता.आणि रोज शाळेतुन घरी नेण्यासाठी आई आम्हाला घ्यायला यायची.आणि तेव्हा तो आईला प्रश्न विचारायचा .."आई आकाश निळे का आहे??गवत हिरवं का आहे ?? समुद्र निळा का दिसतो ??? आणि पावसाळ्यात चाॅकलेटी का दिसतो ??बाप्पा इतकं पाणी कुठे साठवुन ठेवतो??"वगैरे..
मला जरा कुतुहल वाटायचं.. आणि त्याच्या हुशारीचं कौतुक सुद्धा.कारण तो कोणाच्या बोलण्यात फसत नसे आणि मला मात्र कोणाच्याही बोलण्यावर चटकन विश्वास बसायचा.एक दिवस मी पेन्सिल शार्प करत होते.शहाण्या बाळासारखं मी तो कचरा दप्तराच्या एका कोपऱ्यात जमा करत होते तर एक मुलगा म्हणाला ."ऐक तो कचरा मला देना ..."
मी ..."कशाला??तु कचरा वर्गात पसरवशील आणि मला ओरडा बसेल...मी नाही देणार.."
तो ..."अगं आईशप्पथ मी नाही पसरवणार ..
आता तेव्हा कोणी कोणाच्या नावाची शप्पथ खाल्ली म्हणजे तो खोटं बोलणार नाही हे नक्की.कारण जर शपथ मोडली तर ज्याचं नाव असेल तो मरेल... किती विचार करावा लागायचा तेव्हा शपथ घेताना..😂😂😂
मी ..."पण तु काय करणार या कचर्याचं??
तो ..."अगं हा कचरा वाटीत ठेवायचा त्यात तेल टाकून ती वाटी रात्री फ्रीजर मधे ठेवायची . म्हणजे सकाळी त्याचा खोडरबर होतो.रोज नवा खोडरबर...आहे कि नाही मज्जा..."व्वा किती भारी आयडिया ..माझे डोळे आनंदाने चमकले...कधी एकदा घरी जातेय आणि कधी खोडरबर बनवतेय असं झालं माझं...
रात्री आईने विचारले...पण तिला पण माझं मन मोडवेना म्हणून तीने पण ते तसचं ठेवले.. सकाळी उत्साहात मी पाहिले तर ते तसचं होतं... किती घोर निराशा.....खोटं होतं ते... 😂😂😂पण तेव्हा पटलं होतं ते होतं असं..कधी कधी रात्री आवडीचे जेवण नसलं कि चार घासांनंतर पोट भरायचे...मग आई आपलं अस्त्र काढायची..."पोटभर ढेकर येईपर्यंत जेवलं नाही तर रात्री खड्ड्यात पडल्यासारखे वाटतं.
असं वाटतं कि खोल दरीत पडतोय आपण... त्यामुळे पोटभर जेवायला हवं..."रात्री ....खोल दरीत....नको रे बाबा... त्यापेक्षा पटपट गिळलेले बरं....😜😜😜अशीच एकदा मी पिक्चर पाहात होते.त्यात हिरो लहानपणी शाळेत जाताना दाखवला होता त्यानंतर गाडीचं चाक जोरात फिरताना दाखवलं होतं आणि लगेच हिरो मोठा काॅलेजमधे जाताना दाखवला होता...व्वा मला वाटलं आपलं पण असचं चाक फिरणार आणि काहि क्षणात आपण मोठे होणार...पण बरेच दिवस झाले तरी ते चाक काही फिरेना...मग लक्षात आलं कि पिक्चर तिन तासात संपवायचा असतो म्हणून तसं दाखवतात पण खर्या आयुष्यात मात्र रोजच्या घडामोडी होतात..रोज नवे अनुभव मिळतात आणि त्यातुनच आपण शहाणं होत जातो...अश्या लहानपणीच्या गमती जमती...ज्या तेव्हा खर्या वाटायच्या.
धन्यवाद.लेख आवडल्यास नक्की लाईक व कमेंट करा.तुमच्या कमेंट्स नी लिखाणाचा उत्साह द्विगुणित होतो.
30/01/2022
#मराठी
#मराठीभाषा
#मराठीसाहित्य
अरे हिचा परत बेडुक का झालाय??
#आवडत्या फोटो मागची खरी कथा..
फोटो म्हणजे आपल्या भुतकाळातल्या जणु सोनेरी आठवणी आहेत.कधी फोटो पाहायला बसलं कि आपण आधी कसे दिसत होतो...तो फोटो कधी ...कोणी ...कसा ...कुठे काढला आहे याची चर्चा व्हायला सुरुवात होते.त्या फोटोतल्या माणसांच्या आठवणींना उजाळा मिळतो तर त्या फोटोमागची घटना असेल तर ती पुन्हा आठवते.या आठवणी कधी गोड ...कधी कटु ...कधी न आवडणार्या तर कधी आवडणार्या असु शकतात.कधी कधी फोटो मागची खरी कारणं वेगळी असतात पण दिसताना वेगळं च जाणवतं.
आज मी अश्याच एका फोटोबद्दल तुम्हाला गंमत सांगणार आहे.दोन वर्षांपुर्वी कोरोनाच्या कृपेमुळे माहेरी दोन महिने राहायचा योग आला.त्या दरम्यान चार पुर्ण वेगवेगळ्या दिवसांची दिवाळी होती.त्यामुळे आम्ही ठरवुन कोणत्या दिवशी काय कपडे कसा लूक ते आधीच ठरवलं होतं.लक्ष्मीपुजनाला अदिती ने घागरा घातला होता.त्याला मॅचिंग ज्वेलरी मधे खुलून दिसत होतं तिचं रुप.
भाऊबीजेच्या दिवशी मात्र जरा वेगळा लूक विचार करत होती ती...कारण लक्ष्मी पुजनाच्या दिवशी घागर्यामुळे तिला फटाके फोडायला मिळाले नव्हते.आणि नंतर ही फोटो काढून ...कपडे बदलुन जाईपर्यंत सगळ्यांचे फटाके संपत आले होते.. त्यामुळे आज औक्षवणानंतर लगेच फोटोसेशन करुन ती फटाके उडवायला जाणार होती.म्हणुन जीन्स सोबत लाॅंग कुर्ता सोबत जॅकेट असा लूक ठेवला होता तिने..पण झालं काय ...
नभा म्हणजे तीची लहान मामेबहीण तिच्या मेकअप साठी मागे लागली.एकदा हा रंग एकदा ती शेड करत करत मग हेयरस्टाईल वर आली...इथे पिन ..तिथे वेणी करत करत सगळा वेळ गेला आणि तिचा स्वतः चा मेकअप करायचा राहीला.एकच आरसा आणि एकच खोली असल्याने आजीने तिला आधी तयार व्हायला सांगितले.म्हणजे तोपर्यंत त्या बाहेरची तयारी करतील .. आणि मग स्वतः तयार होतील ...
पण अदितीचा बराचसा वेळ नभाने खाल्यामुळे तिची तयारी राहीली.हे सगळं तिच्या आजीला माहीत नव्हते.ती बरोबर अर्ध्या तासात काम करुन खोलीत आली आणि अदिती ला न विचारता तिला बाहेर काढली... आणि वर जरा जोरातच म्हणली ..."किती मेकअप करायचा तो मेला... आम्हाला इथे वेळ नाही घाम पुसायला आणि यांना वेळ मिळत नाही आरश्यासमोरुन हलायला..."
तयार होवून आजी बाहेर आली आणि चला औक्षवण करायला घेऊ असं अदिती ला म्हणाली..पण तोपर्यंत अदितीचा पारा पार उंचीवर पोहोचला होता.पण आजीसमोर बोलायची हिंमत नाही म्हणून मान खाली घालून उभी होती नुसती.तिला नुसती उभी पाहून आजी तिचा चेहरा हाताने वर करत म्हणाली..."अगं चेहेरा धुतलास का फोटो काढायच्या आधी???"झालं....आजीचं हे बोलायचा अवकाश नभा पटकन बरळली ..."अगं आजी दीदूचा मेअकप राहिला होता करायचा.ति माझी तयारी करत होती त्या मुळे तिला मेकअप करायचा वेळ नाही मिळाला.आणि जेव्हा तु तिला बाहेर काढलं तेव्हा च तिनी सुरुवात केली होती..."
आजी ..."अच्छा म्हणून हीचा परत बेडुक झालाय का??"आजीच्या ह्या बोलण्यावर सगळे तोंड दाबून हसायला लागले.(अदिती लहान असताना राग आला कि तोंड फुगवून गप्प बसायची.काहिच बोलायची नाही.तिचा राग शांत होईपर्यंत वाट पाहायला लागायची...म्हणुन ती चिडली कि तिची आजी तिला अजुन चिडवायची...आज काय कारण बेडुक व्हायला...कारण बेडूक फुगल्यानंतर दिसतो तशी अदिती दिसतं असं...)अदिती अजुन रागाने फुसफुसायला लागली.ती मेकअप करुन येते म्हणाली तर आजोबा म्हणाले ..."अगं आता वेळ नको घालवू ..चला पटापट औक्षणं उरकवा...""त्यामुळे अदितीचा मुड पार गेला.जसतसं तिने औक्षण केलं . आणि जेव्हा फोटो काढायची वेळ आली तिचा अजिबात मुड नव्हता.तरी तिची आजी म्हणाली..."काढा रे फोटो ..ती जशी पोझ देते तसाच फोटो काढा...लक्षात राहील ही आठवण कायमची..."तर अशी गंमत आहे या फोटोमागची...
वेळ गेल्यानंतर तिची आठवण राहावी म्हणून आपण फोटो काढतो.तो क्षण पुन्हा मनात साठवुन ठेवत त्या आठवणी जपतो म्हणुनच साजरा करणारा प्रत्येक क्षण आपण कॅमेरात टिपतो ...
धन्यवाद.लेख आवडल्यास नक्की लाईक व कमेंट करा.तुमच्या कमेंट्स नी लिखाणाचा उत्साह द्विगुणित होतो.
30/01/2022
#मराठी
#मराठीभाषा
#मराठीसाहित्य
आजचा विषय ... कितीही मोठी झाली तरी मुलं आईसाठी लहानच...
देखा पिलांसाठी झोका तिने झाडाले टांगला...
अहीराणी भाषेतील सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची एक कविता अभ्यासाला होती.किती छान पद्धतीने त्यांनी त्या सुगरणीचं कौतुक केलं आहे या कवितेत..जशी एक आई आपल्या मुलांसाठी दिवसरात्र झटत असते.तिची जशी आपल्या मुलांवर माया असते तशीच माया सुगरण पक्षी तिच्या पिल्लांवर करते.माहित असुनही कि हि पिल्लं मोठी झाल्यानंतर हे घरटं सोडुन जाणार आहेत पण तिची माया तसुभरही कमी होत नाही.
"अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला...
देखा पिलांसाठी झोका तिने झाडाले टांगला...."
आईची माया अशीच असते.शमिकाला रात्री जाग आली.जरा झोपेतुन सावरून ऊठुन बसली तशी तिला भरपुर थंडी जाणवली.स्वेटर ब्लॅंकेट सगळं होतं पण तरीही थंडीमुळे तिची झोप उघडली होती.जशी तिला थंडी जास्त जाणवली घाईगडबडीत ती लगेच ती उठली आणि शेजारच्या खोलीत झोपलेल्या रुद्र ला पाहायला गेली.पाहाते तर काय??अर्धवट झोपेत अंगाचं मुटकुळे करुन झोपला होता.थंडीमुळे कुडकुडत होता ते वेगळचं.दहावी असल्याने रात्री जागुन थोडावेळ अभ्यास करायचा... त्यामुळे त्याला वेगळी खोली दिली होती.
अभ्यास करता करता झोपल्यामुळे लाईट ...लॅपी सगळं चालू होते.तिने पट्कन रूद्रच्या अंगावर ब्लॅंकेट टाकलं.लाईट ..लॅपटाॅप बंद केला...खिडकी उघडी होती ती बंद केली...ऑलआउट सुरू केले आणि मग तो शांत झोपलेला पाहुन ..खोली गरम झाली याची खात्री करुन त्याच्या खोलीतुन बाहेर पडली.हे सगळं करेपर्यंत रूद्र आरामात पाय ताणुन झोपला.. ब्लॅंकेट मुळे आणि खिडकी बंद झाल्यामुळे खोली व तो गरम झाले होते.
सकाळी आरामात उठल्यावर रूद्र ने आईला विचारले..."अगं आई माहिती आहे का?? रात्री मला कसलं भयानक स्वप्न पडलं ते...?"
त्याचे बाबा ..."कसलं स्वप्न रे रुद्र??सांग कि..."
रूद्र ...."अरे माझ्या स्वप्नात डोरेमाॅन आला होता.माझ्यासोबत छान खेळत होता.आणि अचानक बर्फ पडायला लागला.आम्ही लपायला जागा शोधायला लागलो तर सापडेना...भरपुर थंडी वाजायला लागली... सगळीकडे थंड वारे वाहात होते.आम्ही घरी परत येण्यासाठी खुप जोरात धावत होतो . आणि अचानक अर्ध्या रस्त्यात छान कडक ऊन पडलं.बर्फ गायब... थंडी पण गायब...सगळं अचानक बदललं आणि आम्ही परत खेळायला लागलो...आहे कि नाही भारी गंमत...."
त्यांचं हे बोलणं ऐकून शमिका आणि रुद्रचे बाबा अनमोल जोरजोरात हसायला लागले.रूद्र ला समजेना...तसं अनमोल म्हणाला ..."अरे.. रात्री तु अभ्यास करता करता खिडकी उघडी ठेवून पांघरूण न घेताच झोपला होतास.आधीच थंडीचे दिवस आणि त्यात रात्री पाऊस पडला त्यामुळे वातावरण अजुनच थंड झाले.ते तर आईने ऊठुन रात्री तुला पांघरूण घातलं... खिडकी बंद केली म्हणून तुझा बर्फ पडायचा थांबला आणि उन आलं होतं ...आलं का लक्षात..."
रुद्र ..."हो आई ...तु रात्री उठली होतीस??तु पांघरूण घातलसं मला??पण तुला कसं कळलं मला. थंडी वाजते आहे ते...तु ग्रेट आहेस आई..."असं म्हणत तो आईच्या कुशीत शिरला.शमिका त्याला या प्रश्नांची उत्तरे नाही देऊ शकली...पण तिला जाणवणार्या काळजीचं वर्णन पण नाही करु शकली.कारण असं म्हणतात कि जिथे देव आपली काळजी घ्यायला स्वतः पोहोचु शकत नाही तिथे तो आईला पाठवतो... त्यामुळे कितीही मोठी झाली तरी आई साठी मुलं ही लहानच असतात... अगदी ते स्वतः आई बाबा झाल्यानंतरही ....
धन्यवाद.लेख आवडल्यास नक्की लाईक व कमेंट करा.तुमच्या कमेंट्स नी लिखाणाचा उत्साह द्विगुणित होतो.
Click here to claim your Sponsored Listing.
